घरगुती हिंसाचाराविरुद्ध साक्षीदारांचे कर्तव्य – मदतीसाठी तुम्ही काय करू शकता

Amnesty International India
14 May 2020 11:56 am

सध्या भारतभर लॉकडाऊन असल्यामुळे अनेक महिला त्यांच्याच घरात हिंसक जोडीदारासोबत अडकलेल्या आहेत आणि वाईट म्हणजे त्यांना बाहेर पडण्याचा कोणताही पर्याय सध्या उपलब्ध नाही. लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण राष्ट्रीय महिला आयोगासह अनेक बातम्यांमधूनदेखील समोर आले आहे.

केवळ भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगात जास्तीत जास्त महिला घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी करीत आहेत. नोव्हेल कोरोना विषाणूच्या छायेखाली महिला व मुलींवर होणारे घरगुती अत्याचार हे शॅडो पॅण्डेमिक असल्याचे मत यूएन विमेनतर्फे व्यक्त करण्यात आले आहे. फ्रान्ससारख्या राष्ट्रांनी महिलांवरील हिंसाचाराला आळा घालून त्यांना मदत करण्यासाठी सक्रीय पुढाकार घेतला आहे, ठोस उपाययोजना आखल्या आहेत. वाढत्या हिंसाचाराची दखल घेऊन त्यासंबंधीच्या तक्रारींना व कारवाईला वेग आणण्यासाठी भारतातही राष्ट्रीय महिला आयोगाने व्हॉट्सअप क्रमांक सादर केला आहे.

सध्याच्या काळात अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेला बाहेरून कोणतीही मदत मिळणे कठीण असताना एक समाज म्हणून त्या महिलेच्या मदतीसाठी आपणच पुढाकार घेणे गरजेचे आहे. साक्षीदारांनी योग्य ती कारवाई केली तर केवळ हिंसा थांबणार नाही तर हिंसेला बळी पडलेल्या महिलेला पोलिसांत तक्रार करण्याचे मानसिक बळही मिळू शकेल.

तुमच्या घरात, तुमच्या शेजारी, मित्रपरिवारात किंवा सहकाऱ्यांमध्ये घरगुती हिंसाचार होत असल्याचे तुम्हाला जाणवत असेल तर पिडीत व्यक्तीला मदत करण्यासाठी तुम्ही कारवाई करू शकता. तुमच्या मदतीसाठी खाली काही प्रश्न दिलेले आहेत –

 1. घरगुती हिंसाचार म्हणजे काय?

सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, भारतीय कायद्यानुसार घरगुती हिंसाचार हे कृत्य म्हणजे –

 • शारीरिक अत्याचार (शारीरिक वेदना किंवा नुकसान देणारे कृत्य)
 • मानसिक, वाच्छीक आणि भावनिक अत्याचार (अपमान, अवहेलना, पाणउतारा, धमकी देणे)
 • आर्थिक अत्याचार किंवा कोंडी (एखाद्या व्यक्तीला आर्थिक लाभांपासून वंचित ठेवणे)
 • लैंगिक अत्याचार (महिलेवर अत्याचार, तिचा अपमान, अवहेलना किंवा तिचा विनयभंग)
 1. माझ्यावर घरगुती हिंसा होत नसली, तरीही दुसऱ्या कुणाच्या बाबतीत किंवा त्या व्यक्तीच्या वतीने मी तक्रार नोंदवू शकते का?

होय. एखाद्या घरात घरगुती हिंसा होत असल्याची किंवा तशा शक्यतेची तुम्हाला खात्री असेल, तर तुम्ही नक्कीच तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवण्यापूर्वी पिडीतेची परवानगी घेणे केव्हाही योग्य ठरू शकते. पिडीतेच्या परवानगीशिवाय पोलिसांत तक्रार केल्यास त्याचे परिणाम भविष्यात संबंधित पिडीतेलाच अधिक भोगावे लागू शकतात, हे ध्यानात असू द्या. ते काहीही असले तरी, महिलांवरील हिंसाचार हा कायदेशीर गुन्हा असून अशा प्रकरणी न्याय हा अत्यावश्यकच असतो.

 1. घरगुती हिंसाचाराविरुद्धचे कायदे कोणते?

घरगुती हिंसाचाराविरुद्ध आपण आवाज उठवू शकू असे दोन महत्वाचे कायदे आपल्याकडे आहेत –

 • कोटुंबिक हिंसाचार कायदा, 2005

घरात राहणाऱ्या महिलांचे (पत्नी, लिव्ह-इन जोडीदार, बहिणी, माता, मुली, विधवा) घरातील नवरा किंवा अन्य पुरूष नातेवाईकापासून हा कायदा संरक्षण करतो. या कायद्यामुळे महिलांचा हिंसामुक्त घरात राहण्याचा अधिकार जपला जातो. हा एक नागरी कायदा असून घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी न्यायालयीन आदेश मिळवण्याच्या आणि घरात सुरक्षित राहण्याच्या महिलेच्या हक्काची या कायद्यामुळे जपणूक होते. या कायद्यान्वये, अत्याचार करणाऱ्याला कोणतीही थेट शिक्षा देता येत नाही किंवा दंड आकारला जाऊ शकत नाही. तरीही, न्यायालयाचे आदेश न मानणाऱ्यावर त्वरीत कायदेशीर कारवाई होऊ शकते.

 • भारतीय दंड विधान, 1860

भारतीय दंड विधान, कलम 498 – अ अंतर्गत, खास विवाहित महिलांचे त्यांच्या पती व सासरच्या कुटुंबियांपासून संरक्षण केले जाते. या व्यतिरिक्त, याच कायद्याच्या अन्य कलमांतर्गत बलात्कार, विनयभंग, लैंगिक अत्याचार, असिड हल्ला, पाठलाग, वैषयिक नजरेने पाहणे आणि मुद्दाम केलेले मानसिक खच्चीकरण याविरुद्ध महिलांचे संरक्षण केले जाते. तरीही, वैवाहिक बलात्काराला अद्यापही कोणत्याही कायद्यात अंतर्भूत करण्यात आलेले नसून त्यासंबंधी खटला चालवता येत नाही.

 1. साक्षीदाराची कारवाई म्हणजे काय?

बघ्याची भूमिका घेणारी व्यक्ती किंवा गुन्ह्याची साक्षीदार असलेली व्यक्ती अशा घटनांमध्ये अनेक प्रकारे कारवाई करू शकते. प्रत्यक्ष अत्याचार न अनुभवलेल्या व्यक्तीने घेतलेली भूमिका ही बायस्टॅण्डर अक्शन किंवा साक्षीदाराची कारवाई म्हणून गणली जाते. घरगुती हिंसाचाराबाबत खुलेपणाने बोलणे, त्याविरुद्ध आवाज उठवणे व त्याबाबत व्यक्त होणे या गोष्टींचा यात अंतर्भाव असतो.

 1. घरगुती हिंसाचार ही खासगी बाब आहे, मी त्यात का हस्तक्षेप करू?

घरगुती हिंसाचार ही संबंधित कुटुंबाची किंवा त्या व्यक्तीची खासगी बाब वाटत असली, तरी ती तितकी खासगी नसते. या उलट, हिंसेची साखळी मोडण्यासाठी मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या अशा कृत्याविरुद्ध समाज म्हणून सर्वांनीच ठोस पावले उचलणे गरजेचे असते.

साक्षीदाराच्या कारवाईच्या माध्यमातून आपण खालील गोष्टी करू शकतो –

 • पिडीत महिलेला जेव्हा गरज वाटेल तेव्हा ती शेजाऱ्यांची, मित्रपरिवाराची मदत घेऊ शकते, या बाबतीत ती एकटी नाही तर, समाज तिच्या बाजूने आहे, असा आत्मविश्वास पिडीत महिलेला आपण देऊ शकतो.
 • ठराविक घटना घडण्यापासून आपण थांबवू शकतो.
 • हिंसाचाराची शक्यताच कमी करू शकतो.
 • अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक गंभीर परिणाम रोखण्याचा प्रयत्न करू शकतो.
 • घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी काम करणाऱ्या यंत्रणांचे सबलीकरण.
 • स्थानिक पातळीवर पिडीता व अत्याचार करणारी व्यक्ती यांचे लिंग, वय, शारीरिक-मानसिक कमतरता, पारंपरिकता आणि कौटुंबिक नातेसंबंध याची विश्वसनीय आणि चोख माहिती गोळा करा.
 1. साक्षीदार म्हणून मी काय करू शकतो किंवा शकते?
bystander-action-domestic-violence-marathi

You can download our poster and share it with others!

English.  Kannada. Hindi.  Tamil.  Marathi.

 1. पिडीतेच्या मदतीसाठी मी आणखी काय करू शकतो किंवा शकते?

पिडीतेची तुम्ही कशाप्रकारे मदत करू शकता, हे तिलाच विचारणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. याचबरोबर, पिडीतेच्या मदतीसाठी आपण आणखी काय करू शकतो हे स्थानिक महिला हक्क संघटनांना तुम्ही विचारू शकता. जर संबंधित महिलेला राहण्यासाठी सुरक्षित ठिकाणाची आवश्यकता असेल तर, तिला महिला आधारगृहात न्या व तिथे तिची सोय करा. जर प्रकरण न्यायालयात गेले, तर पिडीतेबाबतचा तुम्हाला आलेला अनुभव प्रामाणिकपणे सांगण्यासाठी मागे पुढे पाहू नका.

 1. पिडीत महिलेला जखमा झाल्या असतील, तर मी काय करायला हवे?

पिडीतेच्या शरिरावर जखमा किंवा व्रण दिसत असतील, तर तिला डॉक्टरांकडे घेऊन जा. तिच्या परवानगीने जखमांचे किंवा व्रणांचे फोटो काढायला तिला मदत करा. प्रथमोपचारासाठी तुम्ही खासगी किंवा सरकारी रुग्णालयात जाऊ शकता. रुग्णालय प्रशासनाकडून वैद्यकीय-कायदेशीर प्रमाणपत्र मिळू शकेल, याची खात्री करून घ्या. अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळवणे हा पिडीतेचा अधिकार असून पिडीतेला झालेल्या जखमांची ती अधिकृत नोंद असते.

 1. हिंसा करणाऱ्याला विरोध करताना मी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी काय करू शकते?

हिंसा करणाऱ्याला विरोध करण्याचे तुम्ही ठरवलेत, तर खालील गोष्टी ध्यानात ठेवा –

 • कोणत्याही परिस्थितीत हिंसा किंवा धमकी देणे टाळा.
 • स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि तुम्हाला अशक्य असलेल्या गोष्टी टाळा. तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशाच पद्धतीने विरोध करा.
 • गरज भासल्यास अन्य लोकांनाही प्रकरणात सहभागी करून घ्या.
 • तुम्हाला नेमके काय करायचे आणि सांगायचे आहे, याविषयी योजना आखा.
 • सुरक्षित वातावरणात संवाद साधा.
 • हिंसा करणाऱ्याला विरोध करण्यापूर्वी तुमच्या माहितीतील किंवा विश्वासातील तिसऱ्या व्यक्तीला याविषयी माहिती द्या.
 • तुम्ही हिंसा करणाऱ्याला विरोध केल्यानंतर पुन्हा एकदा पिडीतेला त्या व्यक्तीकडून त्रास होणार नाही, याची खात्री बाळगा.
 1. हिंसा करणाऱ्या व्यक्तीने माझ्यावरच हात उगारला किंवा मला धमकी दिली तर मी काय करू शकते?

परिस्थिती फारच गंभीर झाल्यास किंवा हिंसा करणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला हिंसा केल्यास, त्वरीत पोलिसांना बोलवा.

 1. प्रकरण घरगुती हिंसाचाराचे असल्याचे सिद्ध करण्यासाठी कोणते कायदेशीर पुरावे आवश्यक असतात?

काही प्रकारच्या हिंसेबाबत तो घरगुती हिंसाचार आहे, हे सिद्ध करणे कठीण असते. अशा प्रकरणांमध्ये ईमेल्स, व्हॉट्सअपवरील संवाद, टेक्स्ट मेसेजेस, ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल्सचे रेकॉर्डिंग आणि मिस्ड कॉल्सचे स्क्रीनशॉट्स हे चुकीच्या वागणूकीचे किंवा हिंसात्मक नातेसंबंधांचे पुरावे म्हणून वापरता येऊ शकतात.

याचबरोबर, यापूर्वी हेल्पलाईनवर केलेले कॉल्स किंवा पोलिसांत केलेली तक्रार हेदेखील पुरावे ठरू शकतात. शारीरिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये वैद्यकीय-कायदेशीर प्रमाणपत्र आणि व्रण, जखमा किंवा खुणांची छायाचित्रे हा पुरावा म्हणून सादर करता येतो. घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये प्रत्यक्षदर्शीची साक्ष मिळणे अवघड असले तरीही, एखाद्या व्यक्तीवर (महिलेवर) अत्याचार होत असल्याची माहिती आपल्याला असेल किंवा आपण तसे प्रत्यक्ष पाहिले असेल तर आपण तशी साक्ष देऊ शकतो.

 1. पिडीत व्यक्तीला मदत नको असेल, तर मी काय करावे?

घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेला त्यासंबंधी चर्चा करणे नक्कीच कठीण वाटू शकते. अशा परिस्थितीत मानसिक न्यूनगंडाची भावना डोके वर काढते आणि दुर्दैवाने अनेक पिडीता या त्यांना मारहाण करणाऱ्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतात. म्हणूनच, पिडीत महिला आपली समस्या नाकारण्याची किंवा त्याविषयी संवाद न साधण्याची शक्यता असते. अशावेळी, तिच्या खासगीपणाचा आदर राखून तिच्या वतीने कोणतीही कारवाई करू नका किंवा ती तयार नसल्यास कारवाई करण्यासाठी तिला जबरदस्ती करू नका. तिला किंवा तिच्या मुलांना पुन्हा मारहाण केली जाईल, अशी तुम्हाला भिती वाटत असेल, तर असे वागता येणे कठीण आहे. पण, तिचा निर्णय तिने स्वतः घेणे गरजेचे असते. संबंधित घटनेबाबत महिलेच्या मनात असलेला न्यूनगंड काढून टाकायला मदत करा आणि पुढील मदत मिळवण्यासाठी तिला प्रोत्साहन द्या. बोलण्याचा व कारवाई करण्याचा तिने निर्णय घेतल्यावर तुम्ही तिच्या मदतीसाठी सज्ज आहात याची तिला खात्री पटवून द्या.

 1. घरगुती हिंसाचार हा कधी पिडीतेचा दोष असू शकतो का?

नाही. घरगुती हिंसाचार हा पिडीतेचा दोष नसतो. घरगुती हिंसा हा गुन्हा आहे. हिंसा सहन करणारी महिला स्वतः किंवा इतर कुणाच्या मदतीने त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकते. परंतु, घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेला सहाय्य करणारी किंवा आत्मविश्वास देणारी यंत्रणा वा व्यक्ती उपलब्ध न होण्याची शक्यता असते. काही वेळा, अत्याचाराची साखळी तोडून बाहेर पडण्यानंतर सुरळीत जीवन जगण्यासाठी तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो. पिडीता अत्याचाराच्या साखळीतून बाहेर न पडण्याची अनेक कारणे असू शकतात. हिंसा करणाऱ्यावर ती आर्थिकदृष्ट्या अवलंबून असू शकते, तिच्याकडे विश्वसनीय सहाय्य यंत्रणा नसते (कुटुंब किंवा मित्रपरिवार), तिला मुले असतील, तर हिंसा करणाऱ्याला सोडून दिल्यानंतरचे गंभीर परिणाम तिला बाहेर पडण्यापासून परावृत्त करू शकतात.

सध्या कोव्हिड – 19 पॅण्डेमिक आणि लॉकडाऊनमुळे, पिडीत महिलांना बाहेरची मदत मिळणे कठीण झाले असून त्या त्यांच्या हिंसक जोडीदारासोबत अडकून पडल्या आहेत. हिंसक परिस्थिती सोडून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे कोणताही मार्ग नाही. आत्ताची परिस्थिती वगळता, सर्वसाधारण काळातही घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी कमीच केल्या जातात. त्यात या पॅण्डेमिकमुळे घरात अत्याचार सहन करणाऱ्या महिलांचे सर्वच मार्ग खुंटले आहेत. घरगुती हिंसा सहन करणाऱ्या महिलेवर अविश्वास दाखवून तिच्याबद्दल ग्रह करून घेण्यापेक्षा तिच्यावर विश्वास ठेवणे जास्त महत्वाचे असते. असे न झाल्यास, तिच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होऊन अत्याचाराची साखळी तोडण्यापासून ती परावृत्त होऊ शकते.

 1. घरगुती हिंसाचार कायदा हा लिंगभेद करणारा असून केवळ महिलांनाच संरक्षण देतो. परंतु, घरातील अन्य सदस्यांनाही घरगुती हिंसा होऊ शकते, मग महिलांवरच लक्ष केंद्रित का केले गेले आहे?

घरगुती हिंसाचाराचा गंभीर परिणाम स्त्री वा पुरूष दोहोंवर सारखाच होऊ शकतो. 2006 साली कायदा सादर करताना या प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन महिला व बालविकास मंत्री रेणुका चौधरी यांनी म्हटले की, समान लिंग कायदा आदर्श ठरू शकतो. परंतु, महिलांनाच पुरूषांकडून सर्वाधिक शारीरिक हिंसा होते हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे असंख्य पुरावे आहेत. हे वास्तव लक्षात घेऊनच, महिलांच्या संरक्षणासाठी घरगुती हिंसाचार कायदा तयार करण्याची गरज भासली. सद्यस्थितीत, समान लिंग कायद्यामुळे समाजाचे भले होण्यापेक्षा त्याचे वाईट परिणामच अधिक दिसून येतील.

Written by Nayantara Raja, Campaigner, Gender and Identity-based Violence, Amnesty International India.

Featured image credit: Reuters | Adnan Abidi